जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैय्या कुमार व त्याच्या शेकडो सहकारी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणाऱ्या मा.नरेंद्र मोदींना ओवेसींचा गुन्हा त्या विद्यार्थांच्या तुलनेत सौम्य वाटतोय कि काय ?
कन्हैय्या देशद्रोही आहे की नाही ? त्याने देशविरोधी घोषणा दिल्या होत्या का ? ज्या व्हिडीओ क्लिप च्या आधारे त्याच्यावर आरोप ठेवले गेले होते ती खरी आहे की खोटी आहे ? या प्रश्नांची उत्तरे तपासामध्ये मिळतील. परंतु कन्हैय्या व त्याचे सहकारी हे विद्यार्थी नेते आहेत. त्यांच्या जेलमधून बाहेर आल्या नंतरच्या भाषणावरून तो देशाच्या राज्यघटनेचा व देशाचा आदर करतो असे स्पष्ट होते. तरीही हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने या संदर्भात न्यायालय काय तो निर्णय घेईल.
परंतु ओवेसीच्या बाबतीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मा.मोदी साहेब कुठले पुरावे गोळा करत आहेत? ओवेसीने आज पहिल्यांदा देशाबद्दल असे उद्गार काढले असे नाही, यापूर्वी देखील अनेक वेळा त्याने अशा प्रकारची चिथावणीखोर भाष्ये, भाषणे केली आहेत. परंतु मोदींनी कधीही या संदर्भात ओवेसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले नाहीत.
त्यामुळे ओवेसी जे काही बरळतो ते केवळ मुसलमानांना हिंदूंच्या विरुद्ध चिथावणी देणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. अशा वक्तव्यामुळे या देशातील हिंदूंची माथी भडकणार हे ओवेसीला चांगले माहित आहे. मुसलमान समुदाय देखील ओवेसीच्या या वक्तव्याला १००% पाठींबा देणार नाही. परंतु १००% हिंदू मात्र या मुद्द्यावर एकतर्फी फक्त ओवेसीच्या नव्हे तर सबंध मुस्लीम समाजाच्या विरोधामध्ये जावे हेच तर ओवेसीच्या त्या वक्तव्या पाठीमागचे मुख्य प्रयोजन आहे.
आता प्रश्न आहे तो, याचा राजकीय फायदा कोणाला होणार ? ओवेसीच्या वक्तव्यामुळे हिंदू एकवटतो हे मा.मोदींना, मा.अमित शहांना व आरएसएस ला चांगलेच माहित आहे. त्यामुळे ओवेसीचे प्रस्थ जेवढे वाढेल तेवढे भाजपच्या फायद्याचे आहे. ओवेसीला जेवढे मोकळे रान दिले जाईल तेवढा भाजपचा फायदा होत राहील असे सरळ सरळ राजकीय गणित आहे.
मा.मोदींना व आरएसएस ला खरंच देशप्रेमाचा व हिंदूचा पुळका असता तर सतत हिंदूंच्या विरुद्ध जाहीर आग ओकणाऱ्या व देशाविरुद्ध युध्द पुकारण्याची भाषा करणाऱ्या ओवेसीचा पुरता बंदोबस्त करणे मा.मोदींना सहज शक्य आहे.
परंतु ते तसे करणार नाहीत. कारण लाखो, करोडो रुपयांची विकासकामे करून जेवढी मते मिळवता येणार नाहीत, तेवढी मते ओवेसीच्या एका वक्तव्याने हिंदू मतांचे केंद्रीकरण होऊन मिळतात असा साधा हिशोब आहे.
मा.मनमोहनसिंह सरकार असतांना देखील हेच ओवेसी लोकसभेत खासदार होते. त्यावेळेस ओवेसीची अशा पद्धतीची चिथावणीखोर भाषा नव्हती. परंतु देशामध्ये मा.मोदी साहेबांचे सरकार आल्यानंतर ओवेसीला भलताच चेव आलाय. मा.मनमोहनसिंग सरकार असतांना ओवेसीची एमआयएम कुठे होती ? आणि आज कुठे आहे ? केवळ हैद्राबाद पुरती मर्यादित असलेली एमआयएम आता (मोदी सरकार आल्यानंतर) देशव्यापी झाली.
कट्टर हिंदुत्वाच्या तुष्टीकरणाच्या वातावरणात देशातील मुसलमान देखील कट्टर मुस्लिम नेतृत्वाच्या आश्रयात जाण्याचा प्रयत्न करणारच. या परिस्थितीत अधिकची जबाबदारी कुणाची ?
मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणणारे मद्यभान भाजपा नेत्यांना त्यांच्या नेतृत्वांकडून मौन प्रोत्साहन मिळते. गोमांस खाल्याचा संशयावरून एखाद्या गरीब मुसलमानाला सबंध गाव ठेचून मारतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यार्थी संघटना काढून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली जाते. कुठल्याही व्हिडीओच्या आधारे शेकडो विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. तेव्हा निश्चितच देश चालविण्याची जबाबदारी अतिशय बेजबाबदार लोकांच्या हातात गेल्याचे प्रमाणित होते.
मा.मोदी साहेब अतिमहत्वकांक्षेपायी या देशावर हुकुमशाही लादतील अशी भीती त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते मा.लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेकांना वाटते.परंतु भारत देशात ते एवढ्या सहजासहजी शक्य नाही. भारतीय जनमानस हे लोकशाही मुल्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. याची मा.मोदी साहेबांना देखील कल्पना आहे. परंतु कधीना कधी मा.मोदी साहेबांना हुकुमशाही आणून स्वतःच्या हातात सर्व सत्ता एकवटून स्वतःच्या मताप्रमाणे राबवायची आहे. त्यासाठी काय कराव लागेल ? भारतीय जनमानस हुकुमशहा मोदी नैसर्गिकपणे कसा स्विकारेल ? या करिता या देशामध्ये देशभक्त व देशद्रोही या विषयावर विभागणी झाली पाहिजे. त्याच वेळी कट्टर हिंदुत्वाला चिथावणी देणाऱ्या घटना अशा रितीने घडल्या पाहिजेत कि त्यामध्ये सरकारचा कुठेही हात दिसता कामा नये. ओवेसीची दर्पोक्ती देखील भाजपच्या दूरगामी रणनीतीचा भाग आहे. अशा पद्धतीने घटना वारंवार घडत गेल्या तर देशामध्ये हिंदुत्वाचा ज्वर तीव्र होणार व आपसुकच कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा मोदींची स्विकार्यता वाढणार अशी भाजपची रणनीती आहे.
एकदा का हिंदुत्वाचा ज्वर पेटला कि, पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारायचे आणि देशात आणीबाणी लागू करायची. हा असेल मोदींचा शेवटचा डाव ! जर हा डाव यशस्वी व्हायचा असेल तर मा.मोदींना १२५ कोटी जनतेला या आणीबाणीची अपरिहार्यता पटवून द्यावी लागेल.
अमोघ वकृत्वकला असलेले मोदी देशवासीयांपुढे '' मन की बात '' जेव्हा मांडतील तेव्हा देशातील जनता प्रसार माध्यमे देखील उपलब्ध परिस्थिती पुढे मोदींचे समर्थन करतील. कारण इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा देश महत्वाचा, देश प्रेम महत्वाचे, पाकिस्तानला धडा शिकविणे तर त्याहून अधिक महत्वाचे. जो मोदींच्या आणीबाणीला विरोध करील तो पाकिस्तान धार्जिणा व जो मोदींना पाठींबा देईल तो खरा देशभक्त अशी नवीन व्याख्या तयार होईल.
त्यामुळे ओवेसी काय बरळतो त्याही पेक्षा जास्त धोका त्याला तसे बरळू देण्याचे कंत्राट कुणी दिले आणि कशासाठी दिले याचा शोध घेणे हे जास्त महत्वाचे आहे.