Monday, 11 April 2016

समता आणि स्वातंत्र्याच्या ज्योतीचा सत्यशोधकी अर्थ....!

   " विद्येविना मती गेली 
    मती विना नीती गेली 
    नीती विना गती गेली
    गती विना वित्त खचले 
    वित्त विना शूद्र खचले 
    एवढे सर्व अनर्थ 
    एका अविद्येने केले "
          - महात्मा ज्योतिराव फुले .



        महात्मा फुले यांच्या ' अखंड ' मधील या इतिहास प्रसिद्ध काव्यपंक्ती म्हणजे हजारो वर्षांपासून या देशातील बहुजन समाजाला , मराठा , माळी , तेली , साळी , कोळी , धनगर , सनगर , वंजारी , बंजारी समाजाला आणि अठरा-पगड जाती आणि बारा बलुतेदारांना या देशातील शोषणवादी व्यवस्थेने शिक्षण नाकारले होते याचा सार म्हणजे या ओळी  आहेत .
       ज्ञानार्जनाचा हक्क शोषणवादी व्यवस्थेने नाकारल्यामुळे या देशातील शूर आणि पराक्रमी मराठा-बहुजन समाजाला आपल सर्वस्व गमावून बसाव लागल . पिढ्यान पिढ्या पुस्तकी शिक्षण न घेतल्या कारणाने मेंदूला एक कुंठीत अवस्था प्राप्त झाली . अआपल्या मेंदूवरच आघात केल्याने आपल्या हितासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याची आपली नीती , आपले धोरणच बिघडले . आणि समाज या व्यवस्थेचा बळी ठरला आणि शोषणवादी व्यवस्थेच्या गर्तेत बुडाला .त्यामुळे समाज गतिहिन झाला .त्याचे वित्त शोषणवादी व्यवस्थेमुळे लुटल्या गेले .आणि त्यामुळे या धर्म व्यवस्थेच्या तळाला असलेला शूद्र समाज स्वत:चे नुकसान करून बसला आणि स्वत:ला धर्माच्या गुलामीत ढकलत राहिला आणि त्या सर्वाचे कारण - अज्ञान आणि विद्यार्जनापासून दूर जाणे होय .    
       छत्रपती शिवाजी महाराजांनी शोषणवाद्यांनी उभी केलेली ही धर्माची गुलामगिरी तुडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला . मनुस्मृतीने शूद्रांना समुद्र उल्लंघन नाकारले होते. समुद्र उल्लंघन करणे धर्माविरुद्ध कृती करणे समजले जायचे अश्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले स्वतंत्र आणि सर्वोच्च दर्जाचे आरमार उभे केले आणि भारताच्या नौदलाची स्थापना केली . महाराजांची ही कृतीमनुस्मृतीनुसार एक गंभीर गुन्हा होता . महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी तो गुन्हा केला .महाराज इथेच थांबले नाही ' ' नंद अंतम् क्षत्रिय अंतम ' असा या व्यवस्थेच्या स्थापनेमागचा इतिहासप्रसिद्ध सिद्धांत होता . म्हणजे काय तर नंद घराण्याच्या अंता बरोबर या पृथ्वीवरील तमाम क्षत्रिय संपुष्टात आले असा हा सिद्धांत सांगतो . त्यामुळे पृथ्वीवर फक्त आता तीन वर्ण उरलेत त्यामुळे चक्रवर्ती सम्राट होण्याचा आणि त्याच्याही पुढे छत्रपती होण्याचा अधिकार ब्राम्हणी-वैदिक व्यवस्थेनुसार आता कोणालाच शिल्लक नव्हता. छत्रपती शिवाजी मह़ाराजांनी शोषणवादी व्यवस्थेचा हा विषमताप्रेरित विकृत सिद्धांत पायदळी तुडवला आणि माणूस मग तो कोणीही असो जो जनकल्याणाचा विचार करतो त्याला छत्रपती होण्याचा अधिकार आहे हा समताधिष्ठीत सिद्धांत प्रस्थापित केला.

        महात्मा फुले यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता . ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी शोषणवादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला आणि रयतेचे राज्य , स्वराज्य उभे केले त्याच पद्धतीने काळाची पाऊले ओळखत आणि ब्रिटिश शासनव्यवस्थेचा अंदाज ओळखत या देशातील शेतकरी , शेतमजूर , कामगार , दलित-अस्पृश्य आणि अठरा पगड जातिसाठी महात्मा फुले यांनी शाळा सुरु केल्या . त्यासाठी स्वत:च्या घरापासून सुरवात केली . स्वत:च्या पत्नीला सावित्रीमाईला नुसते शिक्षण देऊन महात्मा फुले थांबले नाहीत तर त्यांनी सावित्रीमाईला या देशातील पहिली स्त्री शिक्षिका केले .आज ज्या पुण्याची पुनर्स्थापना माँ साहेब जिजाऊ यांनी केली ते पूणे लुटून ,जाळपोळ करून  उजाड करण्यात आले होते .या भूमीवर गाढव फिरवून ही जमीन बंजर करण्यात आली होती . गुलामीची भली मोठी पहार ठोकून तुटकी चप्पल , मोडका झाडू आणि फाटके वस्त्र गुंडाळून ही भूमी अशुभ आहे आणि याला काढण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याच्या वंशाचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी तत्कालीन शोषणवादी व्यवस्थेच्या ठेकेदारांनी दिली होती. विज्ञानवादी विचारांचा आग्रह धरणा~या आणि शुभ-अशुभाची तमा न बाळगणा~या माँ साहेब जिजाऊंनी या बंजर जमिनीवर बाळराजे  शिवरायांच्या साक्षीने  सोन्याचा नांगर फिरवून ही भूमी परत सुजलाम सुफलाम आणि पवित्र केली. त्याच भूमीत सावित्रीमाई फुलेंनी शोषणवाडी व्यवस्थेविरूद्ध विद्रोह करून परत एकदा स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे,शिक्षणाचे विचार प्रसरित करायला सुरवात केली. राज्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार असतांना आमचे सरकारने पुण्यातील विद्यापिठाला सावित्री मायेचे नाव देण्याचा निर्णय घेतला . सावित्री आई फुलेंचे नाव पुणे विद्यापिठाला देण्यासाठी आम्हाला खुप संघर्ष करावा लागला . पण जो संघर्ष क्रांतीज्योती सावित्रीमाईला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना करावा लागला त्यासमोर आमचा संघर्ष काहीच नाही .

      २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी  ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना केली . याच्या  २०० वर्षे अगोदर २४ सप्टेंबर १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा दुसरा राज्याभिषेक अवैदिक अश्या  शाक्त पद्धतीने करवून घेतला आणि ६ जून १६७४ च्या राज्याभिषेकातील तांत्रिक चुका दुरुस्त केल्या .
    ' सर्वशक्ती जगद्पति त्याला नको कोणाची मध्यस्थी ' हे सत्यशोधक समाजाचे ब्रिदवाक्य आहे . त्यात महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अठरापगड जातीच्या बारा बलुतेदारांना  स्पष्टपणे सांगून जातात की या जगाचा सर्वशक्ती जगद्पति जो आहे त्या ' निर्मिका ' पर्यन्त आपल्या मनातील भावना पोहचवण्यासाठी कोण्या दलालाची गरज नाही . याच्या पुढचा विचार संत गाडगे बाबांनी मांडला ते एका कीर्तनात म्हणतात - ' देवळात देव नाही तर पुजा~याचे पोट असते '. सत्यशोधक समाजाने स्वत:च्या विवाह पद्धती सुरु केल्या आणि परंपरागत शोषणवादी पुरोहितशाहीला , ब्राम्हणी व्यवस्थेचा ढोंगीपणा उघड केला. १९ फेब्रुवारी १८६८ ला महात्मा फुल्यांनी रायगडावर जाऊन जगातील पहिली शिवजयंती साजरी केली . 

      महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानायचे याच भावनेतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला . महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन याच्या  'राइट्स ऑफ मैन ' या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव होता . अगदी त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची रयतकल्याणी भूमिका , राज्यपद्धती आणि विचारांचा फार मोठा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता . महात्मा फुले यांनी ज्या प्रमाणे शाळा काढल्या अगदी त्याचप्रमाणे स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला हा महात्मा फुलेंनी सामाजिक न्यायासाठी केलेला सत्याग्रह होता . १८८२ ला हंटर कमिशन ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस महात्मा फुले शेतक~याच्या वेशात हंटर कमिशन समोर उभे राहिले . आणि या देशाचा मालक हा शेतकरी-कष्टकरी समाज आहे हे आपल्या कृतितून सिद्ध केले . शेतक~यांचे दु:ख आणि प्रश्न आणि त्यावर तोडगा सुचवण्याचे काम महात्मा फुल्यांनी स्वाभिमानाने ब्रिटीशांना सांगितले . भविष्यात दुष्काळ आणि पिण्याचे पाणी ही एक समस्या बनून उभी राहील हे दूरदृष्टीकोण असणा~या फुल्यांनी वेळीच ओळखले आणि ब्रिटीशांकडून खडकवासला धरणाचे टेंडर घेतले . खडकवासला धरण ज्यांनी कोणी बघितले असेल त्यांना लगेच लक्षात येईल की धरणाचे बांधकाम अजूनही किती मजबुत आहे .यावरून महात्मा फुले हे किती अव्वल दर्जाचे इंजिनीयर होते हे लक्षात येईल .
          ' गुलामगिरी ' , ब्राम्हणाचे कसब ' ,  ' सार्वजनिक सत्यधर्म '  ही पुस्तके , ' त्रिरत्न ' हे नाटक , ' अखंड ' ह्या काव्यरचना आणि सत्सार १ , सत्सार २ ही विशेष महत्वाची पुस्तके लिहून महात्मा फुल्यांनी शोषणवादाविरूद्ध उभे राहण्याचे शस्त्रागार आपल्याला उपलब्ध करून दिले . समता आणि स्वातंत्र्याच्या ज्योतिचा हा सत्यशोधकी अर्थ म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले ....!

आज त्यांची १८९ वी जयंती त्यांच्या विचारांना आणि कृतीला विनम्र अभिवादन ...!
११ एप्रिल २०१६

Sunday, 3 April 2016

" धन्य तो शिवकाळ.... धन्य ते स्वराज्य ......! "


शिव तुझे नाव ठेविले पवित्र 
छत्रपती सूत्र विश्वाचे की  |              

       - संत तुकाराम महाराज


रयतेचा राजा , बळीराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अगदी सुरवातीलाच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे शिव -सिंधु संस्कृतीशी नात सांगणार " शिव " हे नाव इतक पवित्र आहे की ज्यात विश्वकल्याणाचा विचार आहे. आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्यासाठी छत्रपती सुत्राशिवाय तरणोपाय नाही . छत्रपती सूत्रात, स्वराज्य या संकल्पनेत रयतेच राज्य, बळीच राज्य, स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता आहे असा आशावाद संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त करतात .




       ही परिस्थिती तेव्हाची आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज बाल्यावस्थेत होते. सगळीकडे रयत म्हणजे जिला आपल्या लोकशाही व्यवस्थेत संपूर्ण लोकशाहीची मालक म्हणून संबोधले आहे. त्या रयतेचे हाल हाल सुरु होते. मोगल, सुलतान आपल्या घोड्यांच्या टापांनी स्वराज्य तुडवत होते, बेचिराख करत होते, लुटत होते. रयतेला कोणी वाली नव्हता .रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा कोणी नव्हताच. शाह्या बदलत होत्या पण रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार सुरूच होता. विचार करा ज्या काळात " लोकशाही " या संकल्पनेचा जन्म सुद्धा झाला नव्हता. राष्ट्र कशाला म्हणतात ?  हे फारसे अवगत नव्हते त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात रयत कल्याणाचा आणि रयतेच्या राज्याचा जिथे रयत स्वत: मालक असेल, तिला न्याय मागता येईल अश्या स्वराज्याचा विचार यावा ही गोष्टच कितीतरी मोठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरपण व्यक्त करणारी आहे. 


पण आज वाईट या गोष्टीचे वाटते की चिकित्सा करणारे काही समीक्षक हा मुद्दा लक्षात न घेता खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकशाही मूल्य जपणारे तत्व होते का ? असे बाळबोध प्रश्न विचारतात खरच अशा लोकांची, कीव करावीशी वाटते. अशा लोकांना माझे काही प्रश्न आहेत.आज आपल्या देशात लोकशाही आहे ...  बरोबर ! मग खरच आपल्या देशात आज सामाजिक न्यायाची संकल्पना पुरेपूर राबविल्या जाते का ? या देशात असहिष्णुता सारखे मुद्दे समोर का येतात ? खरच या देशात आर्थिक समानता आहे ? प्रत्येकाच्या गुणवत्तेची कदर या देशात आज लोकशाहीत केली जाते का ? अरे ज्या देशात आजही " भारत माता की जय " म्हणाव की म्हणू नये यावरून " राष्ट्रप्रेम " ठरवल जात असेल तो देश नेमका कोणत्या काळात जगतो आहे याचाही विचार झाला पाहिजे .

    
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या करत होता काय ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयत आणि मुख्यत: शेतकरी उद्ध्वस्त व्हावा असे #Land_Acquisition_Bill " भूमि अधिग्रहण " सारखे कायदे " छत्रपतींचाच आशीर्वाद " मागून पास केले गेले असे एकतरी उदाहरण आहे काय ? 


    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यापैकी काहीही होत नव्हते . शेतक~यांच्या घामाची आणि कष्टाची कदर केल्या जात होती. शिवराज्यात एकाही शेतक~याने आत्महत्या केली नाही . कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात सुखी जर कोण होता तर तो शेतकरी ..! म्हणून त्या काळात एक म्हण होती जी आजही कधी कधी वापरली जाते - " उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी "  हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे व्यवस्थापन होते . आणि आज शेतकरी यात कुठे आहे ? 

शेतक~याला का शौक आहे का मुल-बाळ उघड्यावर सोडून या जगाचा निरोप घेण्याचा ? आत्महत्या करण्याचा ? शेतक~याच्या मालाला योग्य भाव शिवकाळात मिळत होता .त्यामुळे शेतकरी आनंदात होता . आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यात तर जाऊ द्या पण त्याच्या मनालाही असे विचार स्पर्श करत नव्हते .आज नेमकी याउलट परिस्थिती आहे -आज शेतकरी दुष्काळात होरपळतो आहे . पण याचे कसलेच गांभीर्य सरकार आणि व्यवस्थेला , प्रशासनाला दिसत नाही . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडत नव्हता असे नाही . दुष्काळ हा जसा मानवनिर्मित आहे तसाच तो नैसर्गिक सुद्धा आहे . नैसर्गिक दुष्काळ मग एखादे वर्षी पाऊस व्यवस्थित झाला नाही . त्यामुळे पीकपाणी व्यवस्थित झाल नाही तर शिवाजी महाराजांचा आपल्या करवसुली अधिका~यांना स्पष्ट सांगणे असायचे की जुलूम जबरदस्ती करून कोणाकडूनही  शेतसारा वसूल करू  नये .  शेतक~यास त्रास होईल अशी कृती कोणाकडूनही घडता कामा नये . उलट शेतक~यास अश्या संकटाच्या काळात मदत करावी आणि शेतकरी पुन्हा पूर्व अवस्थेला (प्रगती वर) पोहचत नाही तोपर्यंत वसूली करू  नये. एवढे  प्रेम आजच्या रयतेला लोकशाही असताना  सुद्धा मिळते का ? याचे उत्तर - नाही असे आहे  आणि शिवरायांच्या व्यवस्थेचे वर्णन करताना म्हणावेसे वाटते. 

" धन्य तो शिवकाळ , धन्य ते स्वराज्य ....! "



शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३३६ वा स्मृतिदिन त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन ...!


                                                                                                                उमेश पाटील
                                                                                          (सरचिटणीस तथा प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)