Sunday, 3 April 2016

" धन्य तो शिवकाळ.... धन्य ते स्वराज्य ......! "


शिव तुझे नाव ठेविले पवित्र 
छत्रपती सूत्र विश्वाचे की  |              

       - संत तुकाराम महाराज


रयतेचा राजा , बळीराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अगदी सुरवातीलाच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे शिव -सिंधु संस्कृतीशी नात सांगणार " शिव " हे नाव इतक पवित्र आहे की ज्यात विश्वकल्याणाचा विचार आहे. आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्यासाठी छत्रपती सुत्राशिवाय तरणोपाय नाही . छत्रपती सूत्रात, स्वराज्य या संकल्पनेत रयतेच राज्य, बळीच राज्य, स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता आहे असा आशावाद संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त करतात .




       ही परिस्थिती तेव्हाची आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज बाल्यावस्थेत होते. सगळीकडे रयत म्हणजे जिला आपल्या लोकशाही व्यवस्थेत संपूर्ण लोकशाहीची मालक म्हणून संबोधले आहे. त्या रयतेचे हाल हाल सुरु होते. मोगल, सुलतान आपल्या घोड्यांच्या टापांनी स्वराज्य तुडवत होते, बेचिराख करत होते, लुटत होते. रयतेला कोणी वाली नव्हता .रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा कोणी नव्हताच. शाह्या बदलत होत्या पण रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार सुरूच होता. विचार करा ज्या काळात " लोकशाही " या संकल्पनेचा जन्म सुद्धा झाला नव्हता. राष्ट्र कशाला म्हणतात ?  हे फारसे अवगत नव्हते त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात रयत कल्याणाचा आणि रयतेच्या राज्याचा जिथे रयत स्वत: मालक असेल, तिला न्याय मागता येईल अश्या स्वराज्याचा विचार यावा ही गोष्टच कितीतरी मोठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरपण व्यक्त करणारी आहे. 


पण आज वाईट या गोष्टीचे वाटते की चिकित्सा करणारे काही समीक्षक हा मुद्दा लक्षात न घेता खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकशाही मूल्य जपणारे तत्व होते का ? असे बाळबोध प्रश्न विचारतात खरच अशा लोकांची, कीव करावीशी वाटते. अशा लोकांना माझे काही प्रश्न आहेत.आज आपल्या देशात लोकशाही आहे ...  बरोबर ! मग खरच आपल्या देशात आज सामाजिक न्यायाची संकल्पना पुरेपूर राबविल्या जाते का ? या देशात असहिष्णुता सारखे मुद्दे समोर का येतात ? खरच या देशात आर्थिक समानता आहे ? प्रत्येकाच्या गुणवत्तेची कदर या देशात आज लोकशाहीत केली जाते का ? अरे ज्या देशात आजही " भारत माता की जय " म्हणाव की म्हणू नये यावरून " राष्ट्रप्रेम " ठरवल जात असेल तो देश नेमका कोणत्या काळात जगतो आहे याचाही विचार झाला पाहिजे .

    
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या करत होता काय ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयत आणि मुख्यत: शेतकरी उद्ध्वस्त व्हावा असे #Land_Acquisition_Bill " भूमि अधिग्रहण " सारखे कायदे " छत्रपतींचाच आशीर्वाद " मागून पास केले गेले असे एकतरी उदाहरण आहे काय ? 


    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यापैकी काहीही होत नव्हते . शेतक~यांच्या घामाची आणि कष्टाची कदर केल्या जात होती. शिवराज्यात एकाही शेतक~याने आत्महत्या केली नाही . कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात सुखी जर कोण होता तर तो शेतकरी ..! म्हणून त्या काळात एक म्हण होती जी आजही कधी कधी वापरली जाते - " उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी "  हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे व्यवस्थापन होते . आणि आज शेतकरी यात कुठे आहे ? 

शेतक~याला का शौक आहे का मुल-बाळ उघड्यावर सोडून या जगाचा निरोप घेण्याचा ? आत्महत्या करण्याचा ? शेतक~याच्या मालाला योग्य भाव शिवकाळात मिळत होता .त्यामुळे शेतकरी आनंदात होता . आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यात तर जाऊ द्या पण त्याच्या मनालाही असे विचार स्पर्श करत नव्हते .आज नेमकी याउलट परिस्थिती आहे -आज शेतकरी दुष्काळात होरपळतो आहे . पण याचे कसलेच गांभीर्य सरकार आणि व्यवस्थेला , प्रशासनाला दिसत नाही . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडत नव्हता असे नाही . दुष्काळ हा जसा मानवनिर्मित आहे तसाच तो नैसर्गिक सुद्धा आहे . नैसर्गिक दुष्काळ मग एखादे वर्षी पाऊस व्यवस्थित झाला नाही . त्यामुळे पीकपाणी व्यवस्थित झाल नाही तर शिवाजी महाराजांचा आपल्या करवसुली अधिका~यांना स्पष्ट सांगणे असायचे की जुलूम जबरदस्ती करून कोणाकडूनही  शेतसारा वसूल करू  नये .  शेतक~यास त्रास होईल अशी कृती कोणाकडूनही घडता कामा नये . उलट शेतक~यास अश्या संकटाच्या काळात मदत करावी आणि शेतकरी पुन्हा पूर्व अवस्थेला (प्रगती वर) पोहचत नाही तोपर्यंत वसूली करू  नये. एवढे  प्रेम आजच्या रयतेला लोकशाही असताना  सुद्धा मिळते का ? याचे उत्तर - नाही असे आहे  आणि शिवरायांच्या व्यवस्थेचे वर्णन करताना म्हणावेसे वाटते. 

" धन्य तो शिवकाळ , धन्य ते स्वराज्य ....! "



शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३३६ वा स्मृतिदिन त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन ...!


                                                                                                                उमेश पाटील
                                                                                          (सरचिटणीस तथा प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

No comments:

Post a Comment